
नऊ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दिवसभर मतदारांच्या दिमतीला होते. मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था असो किंवा मतदार यादीतील नावे शोधून देणे असो, कार्यकर्त्यांची दिवसभर धडपड सुरू होती.
प्रतीक्षा नगर, माटुंगा परिसरात मराठी मतदारांचा टक्का अधिक आहे, तर वडाळा आणि अँटॉप हिल परिसरात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या भागांमध्ये झोपडपट्टीतील मतदार निर्णायक ठरतो. त्यामुळे येथील मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी कार्यकर्त्यांनी घेतली होती. काही मतदारांची नावे स्थानिक यादीत न सापडल्याने ती शोधून देण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
दुपारनंतर गर्दी ओसरली
सकाळच्या टप्प्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली. पुढे सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने अनेकांनी लवकर मतदान करून पिकनिकचा बेत आखला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर काही मिनिटांतच मतदारांना मतदान करता आले.
‘वन नेशन, वन वोट’ नकोच
मतदार याद्यांमध्ये घोळ असतो. अनेक मतदारांची नावे नसतात, तर नावांमध्ये चुका आढळतात. प्रत्येक निवडणुकीत यंत्रणा अपुरी पडते. निवडणूक प्रक्रियेतील हे दोष आधी सुधारावेत. तोपर्यंत ‘वन नेशन, वन वोट’ची तयारी नको, अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली.






























































