सत्ता आणि पैशांचा माज असलेल्यांना जनतेने धडा शिकवला, विजयानंतर शिवसेना आमदार सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया

“हा आमचा बालेकिल्ला होता. मिंधे गटाने केलेल्या गद्दारीनंतर जनतेने त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली. तसेच जनतेनेही ठामपणे ठरवले की सत्ता आणि पैशांचा माज असलेल्यांना पराभूत करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची,” असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी विजय मिळाल्यानंतर सांगितले.

“या विजयासाठी साथ देणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही जनतेच्या अपेक्षांना पात्र ठरू आणि प्रामाणिकपणे लोकांची सेवा करू. मात्र, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत घोळ घालण्यात आला, तसाच प्रकार या निवडणुकीतही झाल्याची भावना आहे. जनतेचा स्पष्ट पाठिंबा उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांना असताना देखील जो निकाल लागला, त्यामागचे सत्य सर्वांनाच माहीत आहे. ज्यांनी हा घोळ घातला आहे, त्यांना भविष्यात याचा नक्कीच पश्चाताप होईल,” असेही सुनील शिंदे म्हणाले.