
नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये गद्दार सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षातील एबी फॉर्म वादामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली असतानाही त्यांनी थेट भाजपच्या अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांना पराभव केला आहे. त्यामुळे हा विजय भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या प्रभाग क्रमांक 29-अ मध्ये त्यांच्या मुलाचा झालेला पराभव हा राजकीयदृष्ट्या फार मोठा धक्का मानला जात आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या दीपक बडगुजर यांना पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. भाजपने बंडखोरी केल्याने मुकेश शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र या कारवाईचा कोणताही परिणाम मात्र मतदारांवर झाला नाही. उलटपक्षी मुकेश शहाणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
याच प्रभागात भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर यांचा पराभव झाला आहे. एबी फॉर्म वाटपातील भाजपातील गोंधळामुळे प्रभाग क्रमांक 29-अ निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला होता. तसेच मुख्य म्हणजे भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर, तर दुसरीकडे त्याचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले मुकेश शहाणे यांच्या लढतीकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले होते.





























































