
संत महदंबा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा ऊर्फ रूपाईसा (जन्म – इ.स.1238; मृत्यू- इ.स.1308) ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. 13 व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. त्यांचे योगदान पाहता त्या पंथाची मोठी आईच होत्या. सर्वजण त्यांना आऊसा म्हणजे आई म्हणत. महदंबा यांचे जीवन विलक्षण होते. त्यांनी बालविधवा ते विद्वान संन्यासिनी व कवयित्री असा प्रवास केला. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत त्यांच्या भक्तीत रममाण होताना महादाईसाच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. त्यांची भक्ती डोळस होती. बुद्धीची आणि चौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती. आद्य कवयित्री म्हणून महादाईसा यांचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास झाला आहे.






























































