
>> वर्णिका काकडे
विदर्भाच्या उत्तर डोंगर पठारावर ते महादेवाच्या डोंगरापर्यंत ‘कोरकू’ आदिवासी बांधव वस्ती करून राहिलेले आहेत.
कोरकू ही या जमातीची स्वतंत्र बोलीभाषा असून ‘मुंडा’ किंवा ‘खेरवारी’ भाषासमूहामध्ये तिची गणना होते. मात्र या भाषेला कोणतीही लिपी नाही. कोरकू बोली भाषेत मराठी, हिंदी, नेमाडी शब्द इतके मिसळले आहेत की त्यातून खरी कोरकू भाषा कोणती हे ओळखणे कठीण आहे. मध्य प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या कोरकू शब्दकोषाची तपासणी केली असता असे दिसून आले की या कोषातील 1955 शब्दांपैकी 30 शब्द सरळ मराठी शब्द आहेत.
कोरकू माणूस ज्यावेळी हिंदीतून बोलतो त्यावेळी एखादा इंग्रज हिंदी बोलतो आहे, असा भास होतो. जसे “तुम किधर जा रहे हो? “मै तो धारणी जाता हुं” असं सांगताना कोरकू माणूस साहेबी थाटात म्हणेल “टुम किढर जा रहे हो”, “मै टो ढारणी जाटा हुं.”
सातपुडा तसेच मेळघाटातील कोरकू लोक, त्यांचे राहणीमान, चालीरीती, त्यांची सांस्कृतिक वैशिष्टय़े मी जवळून पाहिली आहेत. त्यांच्या बोलीभाषेत इतर भाषेतील शब्दांची सरमिसळ झालेली असली तरी त्यांनी आपली मूळ भाषा टिकवलेली आहे. तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या प्रमाणभाषा या आदिम द्रविड भाषिक परंपरेतूनच निर्माण झाल्या. भाषाशास्त्रज्ञांनी त्यांच्या भाषेचा अभ्यास करून जरी असे वर्ग केलेले असले तरी वर उल्लेख केलेल्या इतिहासाप्रमाणे ‘लोक’ म्हणून ते वेगळे नव्हते. या भाषांमध्येही पुष्कळ साम्य आहे.
भारतीय भाषांचे ब्रिटिश काळातील प्रमुख अभ्यासक आणि ‘द लिंग्विस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’चे जनक जॉर्ज ग्रिअर्सन यांनी नमूद केले आहे की, मुंडा हे जे भाषिक उपकूळ आहे ते प्राचीन काळच्या द्रविड-मुंडारी कुळापैकीच असावे. म्हणजे मुळात कदाचित एक भाषाकूळ असावे आणि नंतर त्याचे विलगीकरण झाले असावे.
मेळघाटातील कोरकू भाषेचा उत्तम अभ्यास अचलपूरच्या डॉ. काशीनाथ ब्रहाटे यांनी केलेला आहे आणि त्यामधून ‘कोरकू बोली – वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास’ हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. हा अभ्यास मुख्यत भाषाविज्ञानाच्या अंगाने केलेला असला तरी त्याच्या परिशिष्टांमध्ये कोरकू लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे आणि वाक्य व शब्दसंग्रह हेही दिलेले आहेत.































































