विद्याधर पुंडलिकांच्या कथा इंग्रजीत; ‘प्रवाह’द्वारे प्रयोगशील उपक्रम

मराठी साहित्यजगतात लेखकाइतकेच प्रयोगशील आहेत ते प्रकाशक. लेखकाची अभिव्यक्ती वाचकांपर्यंत पोहोचवताना त्यातील तांत्रिक बाजू सांभाळत पुस्तकाचं संपादन आणि सौंदर्य दोन्ही राखलं जाईल हा प्रयत्न अगदी समर्पित वृत्तीने होत असतो. असे प्रकाशक याही पलीकडे जात साहित्यविश्वात स्वतंत्र योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतात. मराठी साहित्यविश्वातील अशा प्रयोगशील प्रकाशनांपैकी एक म्हणजे पद्मगंधा प्रकाशन. मराठी साहित्यातील सर्व प्रकार प्रकाशनात आणणाऱ्या पद्मगंधा प्रकाशनाची लोकसंस्कृती, लोकसाहित्य, संशोधनपर लेखन या विषयावरील पुस्तकं प्रकाशित करण्याबाबत आगळी ओळख आहे. अनुवादित साहित्याबाबतही हेच म्हणता येईल. पद्मगंधा प्रकाशनाचा अनुवादित साहित्यावर आधारित दिवाळी अंक विशेष लोकप्रिय आहे. इंग्रजी व इतर भाषांतील साहित्य मराठीत आणतानाच आता या प्रकाशनाच्या ‘प्रवाह’ या उपक्रमाद्वारे दर्जेदार मराठी साहित्य इंग्रजीत आणले जाणार आहे. मराठीतील प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या निवडक कथांचा इंग्लिश भाषेतील अनुवाद येत आहे. लेखक विलास साळुंके अनुवादित  ‘फ्रॅगरन्स ऑफ शॉर्ट स्टोरीज’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून यात विद्याधर पुंडलिक यांच्या एकूण 13 कथा संपादित केल्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या या कथा आहेत.