
>> तृप्ती कुलकर्णी
प़्रेम ही मानवी जीवनातील एक अत्यंत मूलभूत, तरल आणि आदिम भावना… तिचं स्वरूप अनुभवाच्या पातळीवर जितकं सघन, तितकंच ती शब्दांत पकडणं अवघड. कविताही अशाच अव्यक्त भावनांना क्षणिक, तरीही अर्थपूर्ण आकार देणारी अभिव्यक्ती… म्हणूनच कविता केवळ शब्दांचा आविष्कार न राहता संवेदनांचा, अनुभूतींचा संवाद ठरते. लेखिका, अनुवादिका, कवयित्री मृणाल काशीकर खडक्कर लिखित ‘सिंड्रेला’ हा प्रेम कवितांचा संग्रह यादृष्टीने लक्षवेधी ठरतो.
या कविता वाचताना प्रकर्षाने जाणवते ती संवादाची ओढ. ती केवळ दोघांमधल्या संवादापुरती मर्यादित न राहता स्मृती, प्रतीक्षा, अनुपस्थिती आणि आत्मसंवाद अशा अनेक पातळ्यांवर विस्तारते. म्हणूनच ‘सिंड्रेला’ केवळ प्रेम कवितांचा संच न राहता तो जणू प्रेमाचं टपाल बनतो… कधी थेट शब्दांत लिहिलेलं, कधी मौनातून पोहोचलेलं.
यातलं प्रेम व्यक्त-अव्यक्त अशा दोन्ही स्तरांवरचं आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे असले तरीही त्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याची अपरिहार्यता कवयित्रीला जाणवते. या द्वंद्वातूनच ‘प्रेमाचं टपाल’ आकार घेतं. जणू कवयित्री प्रियकरास उद्देशून लिहिते, माहिती देण्यासाठी नव्हे, तर अस्तित्वाची, जाणिवेची खात्री देण्यासाठी.
या संग्रहाकडे केवळ स्त्राrकेंद्री दृष्टिकोनातून पाहणं अपुरं ठरेल. यातल्या कविता स्त्राr-पुरुष यांच्या सहजीवनाचं, परस्परावलंबित्वाचं सूक्ष्म दर्शन घडवतात. प्रिय व्यक्तीच्या उपस्थितीत जाणवणारं पूर्णत्व आणि अनुपस्थितीत निर्माण होणारं अपूर्णत्व या दोन्ही अवस्था समान तीव्रतेनं कवितांमध्ये प्रतिबिंबित होतात. प्रेम ही भावना एका अस्तित्वापुरती मर्यादित नसून दोन जिवांमधील संवादातूनच अर्थपूर्ण होत जाते, हे यातलं महत्त्वाचं सूत्र.
या कविता जणू काव्यात्मक पत्रांसारख्या आहेत… काही थेट संबोधनातून पुढे येतात, तर काही आठवणींच्या, प्रतीक्षेच्या आणि मौनाच्या माध्यमातून. या प्रेम टपालांमधून व्यक्त होणारं प्रेम अनेकदा देहाच्या पलीकडे जातं. प्रिय व्यक्ती असण्याचा आणि नसण्याचाही त्रास जेव्हा जाणवतो, तेव्हा प्रेम अधिक प्रगल्भ पातळीवर पोहोचतं. या अनुभूतीचं प्रभावी दर्शन ‘प्रवाह’ या कवितेत घडतं-
मला नं, प्रेमात पडायचं आहे पुन्हा
स्वतच्या, तुझ्या, आयुष्याच्या,
रोज खिडकीतून येणाऱ्या ऊबदार कवडशाच्या,
रोज नव्याने समोर येणाऱ्या दिवसाच्या,
इतकं का प्रेम आहे जगण्यावर ते माहीत नाही, पण आहे
या कवितेतलं प्रेम व्यक्तीपुरतं नसून समग्र जगण्याला व्यापणारं आहे. जीवनाच्या लहानसहान क्षणांमध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे कधीतरी ही कवयित्री प्रियकराला अमलताशासारख्या प्रतिमेतूनही साकारते. त्यातून प्रतीक्षा, सौंदर्य आणि मोह यांचा सुंदर संगम दिसतो-
तुझ्या इतकाच वाट बघायला लावतो हादेखील
आणि मोहून टाकतो रूपाने असा काही की,
सारं काही पिवळंजर्द होऊन जातं,
बहराच्या नशेने बाकी कसला लवलेश उरतच नाही’
या प्रतिमांमधून कवयित्रीची प्रतिमाशक्ती, भावनिक सूक्ष्मता स्पष्ट होते. या प्रेमात मीरेसारखं झपाटलेपण आहे, पण ते संयत आणि अंतर्मुख आहे. प्रेमाला स्पर्शाचा आधार प्रत्येक वेळी प्रत्यक्ष मिळेलच असं नाही. अनेकदा तो स्पर्श मौनात, अंतरात आणि प्रतीक्षेत व्यक्त होतो आणि हे मूक राहणंही प्रेमाला वेगळ्याच उंचीवर नेतं. ‘प्रेम’ या कवितेत कवयित्री देह आणि मन यांमधील फरक स्पष्टपणे अधोरेखित करते…
शरीरावर प्रेम करताना
थकून जातात माणसं…
खूप अवघड असावं ते…
आकारांच्या पल्याड जाऊन
व्रणांची आवरणं ओलांडत,
कातडीच्या पल्याड पोचत
मनाचे तळ गाठणं
सोपं नसणारच
अशा सहजतेने शरीर मन यातला फरक सांगतानाच मिलन, विरह, आनंद, दुःख, प्रतीक्षा आणि आत्मभान अशा विविध भावना यातल्या पंच्याहत्तर कवितांमधून उलगडतात… या भावनांची परस्पर गुंफणच प्रेमाला अधिक व्यापक आणि सक्षम घडवते. शिवाय यात कवयित्रीनं आयुष्याच्या विविध टप्प्यांवरचं प्रेम हे अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रगल्भतेनं व्यक्त केलं आहे. त्यामुळे ‘सिंड्रेला’ हे पुस्तक केवळ भावनिक अनुभव न राहता, प्रेमाच्या प्रवासाचंही दस्तऐवजीकरण ठरतं.
अलीकडच्या मराठी कवितेत दुर्मिळ होत चाललेल्या विशुद्ध प्रेमभावनेचं हे पुस्तक संयत भाषा, चपखल प्रतिकात्मकता आणि संवादात्मक रचनेमुळे विशेष उल्लेखनीय ठरेल. प्रेमाचा प्रगल्भ अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी ‘सिंड्रेला’ हे निश्चितच वाचनीय, संग्रहणीय आहे.
सिंड्रेला
कवयित्री : मृणाल काशीकर खडक्कर
प्रकाशक : लोकव्रत प्रकाशन



























































