नोंद  – कृतज्ञतेची पोचपावती 

>> रविप्रकाश कुलकर्णी

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम 98 व्या म्हणजे दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनापासून सुरू झाले. सातारा येथे झालेल्या 99 .भा.. साहित्य संमेलनाला शतकपूर्व संमेलन म्हणण्यात आलं. अर्थात त्यामुळे शंभरावे साहित्य संमेलन कुठे असणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले

सातारा येथील संमेलनाचा समारोप समारंभ नेते मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. या समारोप सोहळ्यात प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी शंभरावं साहित्य संमेलन पुण्यात होणार हे तर सांगितलंच आणि ते महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आयोजित असेल हे जाहीर करून टाकलं! त्यामुळे इतर ठिकाणी संमेलन करण्यासाठी उत्सुक मंडळी आश्चर्यचकितही झाली, तर माझी काही मित्रमंडळी माझ्याकडे पाहू लागली. याचं कारण 100 व अखिल भारतीय साहित्य संमेलन पुण्यात होणार हे मी आधीच वर्तवलं होतं.

महामंडळाचे ऑफिस मुंबईहून पुण्याला स्थलांतरित झाले तेव्हाच शंभरावं संमेलन पुण्यात होणार हे नक्की होतं. याचं कारण साहित्य संमेलनाचा जन्म म्हणा, सुरुवात म्हणा पुण्यात महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने झालेली आहे. अशा उपामाचा शंभरावा वाढदिवस पुणे येथेच होणार आणि मिलिंद जोशी व त्यांचे उत्साही सहकारी मोठय़ा धूमधाम पद्धतीने साजरा करणार हे सांगायला ज्योतिषी कशाला हवा? फक्त मिलिंद जोशी समर्थ आहेत हे काय वेगळे सांगायला हवे?  याला जोडून आणखी एक गोष्ट आहे- साहित्य संमेलन ही कल्पना मांडणाऱ्या महादेव गोविंद रानडे यांचे हे 125 वे स्मृती वर्ष आहे (जन्म 18 जानेवारी 1842, मृत्यू 16 जानेवारी 1901). प्रबोधन पुरुष असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो त्या रानडे यांच्या वैचारिक व कृतिशील वारशाला उजाळा देण्याचे काम संमेलनासारख्या उपामाने नक्की होणार आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 125 व्या स्मृती वर्षाची आठवण ग्रंथोतेजक सभा, पुणे यासारख्या संस्थेने ठेवलेली आहे. साप्ताहिक साधनानेदेखील याबाबत पुढाकार घेऊन कृतिशील कार्पाम करण्याचे योजिले आहे. त्यातील एक म्हणजे रानडे यांचे मिसेलेनियस रायटिंग्च, रिलीजियस अँड सोशल रेफॉर्म आणि एसेजऑन इंडियन इकॉनॉमिक्स या तीन महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले आहेत.

भारतीय अर्थकारणावरील निबंध, धार्मिक व सामाजिक सुधारणा, संकीर्ण निबंध अशा या तीन पुस्तकांचे मराठी अनुवाद जाणते अनुवादक अवधूत डोंगरे यांनी केलेला असून त्याला अपामे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांची विवेचक प्रस्तावना आहे. या ग्रंथांचे रानडे काळातील महत्त्व आणि आजच्या काळातदेखील त्याची उपयुक्तता याचा वेध घेण्याचा प्रयत्न प्रस्तावनाकारांनी केलेला आहे. अशा तऱहेने उत्सवी आणि कृतिशील पद्धतीने न्यायमूर्ती रानडे यांचे स्मरण नक्कीच स्फूर्तिदायी ठरावे.  तेव्हा शंभरावे साहित्य संमेलन पुण्याला होणार हे मी आधीच  वर्तवले होते याचे आता तरी आश्चर्य वाटायला नको!