होऊ द्या खर्च! एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आपल्या सदस्यांना नव्या वर्षात एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून पीएफचे पैसे थेट यूपीआयद्वारे काढता येणार आहेत. हा नवीन सुविधा मिळणार असल्याने याचा थेट लाभ देशातील 8 कोटी सदस्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारने एक अशी सिस्टीम तयार केली आहे ज्याद्वारे सदस्य पीएफमधून थेट यूपीआयद्वारे पैसे काढू शकतील. सध्या केंद्रीय कामगार मंत्रालय या प्रकल्पावर काम करत आहे. नवीन प्रणालीमध्ये ईपीएफ निधीचा काही भाग सुरक्षित ठेवला जाईल, तर मोठा भाग सदस्यांसाठी उपलब्ध असेल. ईपीएफओचे सदस्य त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या यूपीआय पिनचा वापर करून हे पैसे थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकतील. एकदा पैसे बँक खात्यात आल्यानंतर ते एटीएममधून काढू शकता येतील किंवा डिजिटल पेमेंटसाठी वापरता येतील. ईपीएफओने याआधीच ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांऐवजी 5 लाख रुपये केली आहे. यामध्ये आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदी यासाठी रक्कम काढता येईल.

नोकरी गेल्यास 75 टक्के रक्कम काढता येणार

पीएफ काढण्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या सदस्याची नोकरी गेली तर त्या व्यक्तीला एका महिन्यानंतर पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येईल. यामुळे तो बेरोजगारीच्या काळात आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. पीएफमध्ये जमा उर्वरित 25 टक्के हिस्सा नोकरी सुटल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येईल, असे नव्या नियमात म्हटले आहे.