लढाई संपलेली नाही, सुरू झाली आहे! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना मार्गदर्शन, शिवसेनेच्या जयघोषाने ‘मातोश्री’ परिसर दुमदुमला

‘प्रतिकूल परिस्थितीत लागलेला मुंबईचा निकाल अभिमानास्पद आहे. पण लढाई संपलेली नाही, आता सुरू झालेली आहे. तुमची जिद्द कायम ठेवा. या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू,’ असा जबरदस्त विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबई महापालिकेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीला जोरदार टक्कर देत 65 जागांवर दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेच्या या विजयी शिलेदारांनी शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ‘मातोश्री’ परिसरात शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धव साहेब आगे बढो…’ अशा घोषणा देत ‘मातोश्री’चा परिसर दणाणून सोडला.

यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, आमदार महेश सावंत, आमदार अनंत (बाळा) नर हेही यावेळी उपस्थित होते.

मराठी माणूस त्यांना क्षमा करणार नाही!

‘भाजपने गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी हा विजय मिळवला आहे. हे पाप आहे. या पापाला मुंबईकर, मराठी माणूस कधीच क्षमा करणार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.