
पालिकेच्या निवडणुकीत बलाढय़ धनशक्ती आणि सत्तेच्या शक्तीसमोर, यंत्रणांसमोर आपण जे आव्हान उभं केलं आणि जिंकून दाखवलं ते मोलाचं आहे. पैशाच्या आणि खोटेपणाच्या गोंगाटात मराठीचा आणि मुंबईचा सक्षम आवाज आपण टिकवून ठेवला आहे. आता निवडणूक जरी संपली असली तरी महाराष्ट्ररक्षणाचा आपला संग्राम संपलेला नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
पालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर आपली भूमिका मांडताना सर्वप्रथम जिंकून आलेल्या नगसेवकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिवसरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय मिळवणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. त्याचसोबत त्या सर्व इच्छुक उमेदवारांचेदेखील मी ऋण व्यक्त करतो, ज्यांनी त्यांची इच्छा बाजूला ठेवून त्यांचे महाराष्ट्रप्रेम जागृत ठेवले, असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या हातात चार वर्षे प्रशासक आणि महानगरपालिका, त्याचसोबत यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकार, निवडणूक आयोग होता, तरीही निकालाचे आकडे फार बोलके आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यांनी आपले 54 नगरसेवक फोडूनदेखील आपले 65 आले!
निवडणुकीत जय-पराजय होत राहतील, पण एक दिवस नक्कीच मुंबई त्यांच्या ताठ मानेने उभी करू! एक दिवस असाही येईल की, राजकारण हे मुद्यांवर असेल, केलेल्या कामावर असेल, नैतिकतेवर असेल, ते दिवस आपण आणू असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.





























































