काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस, पालिका निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा  द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने आज कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.

काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी सोबत लढवली. या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 24 जागांवर विजय मिळवता आला. पक्षाच्या या कामगिरीचे खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडत त्यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी जगताप यांनी केली आहे.

निवडणूक निकाल येण्यास 24 तास उलटण्याआधीच भाई जगताप यांनी जाहीरपणे गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी करून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत आपण लेखी खुलासा करावा. विहित मुदतीत आपला  समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे सचिव आणि  मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.