
मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक असलेल्या केजरीवाल यांनी म्हटले की, भाजपला बहुमताचा आकडा गाठता न येणे हेच लोक भाजपच्या विरोधात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “इतक्या गोंधळ, गैरप्रकार आणि यंत्रणेचा वापर करूनही भाजप बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही. याचा अर्थ लोक भाजपच्या विरोधात आहेत. मात्र भाजपकडून सत्तेचा आणि यंत्रणेचा सर्रास गैरवापर केला गेला.”
तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या केजरीवाल यांनी राज्यातील भाजपच्या दीर्घकालीन सत्तेवरही निशाणा साधला. “गेल्या 30 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. या 30 वर्षांत भाजपने गुजरातला खड्ड्यात घातले आहे. राज्यात सर्वत्र भीती आणि भ्रष्टाचार आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जाते, तुरुंगात टाकले जाते. भ्रष्टाचार उघडपणे केला जातो आणि त्याविरोधात कोणीही बोलू शकत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल पुढे म्हणाले की, मर्यादित साधनसंपत्ती असूनही आम आदमी पार्टीला गुजरातमध्ये वाढता पाठिंबा मिळत आहे. “लोक आपकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. गेल्या 6–7 महिन्यांत आम्ही संपूर्ण गुजरातमध्ये सभा घेतल्या. मोठ्या संख्येने लोक या सभांना येत आहेत. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही गरीब पक्ष आहोत. तरीही लोक स्वतःच्या खर्चाने आपच्या सभांना येत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या दौऱ्याबाबत माहिती देताना केजरीवाल म्हणाले की, “मी तीन दिवस गुजरातमध्ये आहे. या काळात स्वयंसेवकांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवणार आहे.” बीएमसी निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावा करत, केजरीवाल यांनी आप पक्षाचा राज्यातील वाढता प्रभाव अधोरेखित केला.


























































