खासदार मनोज तिवारी यांच्या घरातच चोरी, माजी कर्मचाऱ्यानेच हात साफ केल्याचे निष्पन्न

manoj-tiwari

भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या मुंबईतील घरात झालेल्या चोरीप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. ही चोरी कोणत्याही बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर मनोज तिवारी यांच्या घरात पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अंधेरी पश्चिमेकडील शास्त्रीनगर परिसरातील सुंदरबन अपार्टमेंटमधील मनोज तिवारी यांच्या निवासस्थानी ही चोरी घडली होती. या प्रकरणी तिवारी यांचे व्यवस्थापक प्रमोद जोगेंदर पांडेय यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच अंबोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेंद्र कुमार दीनानाथ शर्मा असे असून तो सुमारे दोन वर्षांपूर्वी मनोज तिवारी यांच्या घरी काम करत होता. नंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रमोद पांडेय हे गेल्या जवळपास 20 वर्षांपासून मनोज तिवारी यांचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील बेडरूममध्ये ठेवलेली 5 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. विशेष म्हणजे, जून 2025 मध्येच कपाटात ठेवलेले 4 लाख 40 हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले होते; मात्र त्यावेळी चोरी करणाऱ्याचा कोणताही सुगावा लागला नव्हता.

सतत होत असलेल्या रोख रकमेच्या गहाळ प्रकरणांमुळे डिसेंबर 2025 मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता सीसीटीव्ही अलर्टमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फुटेजमध्ये पूर्व कर्मचारी सुरेंद्र कुमार शर्मा घरात चोरी करताना स्पष्टपणे कैद झाला.

सीसीटीव्ही चित्रफितीत आरोपीकडे घर, बेडरूम आणि कपाट उघडण्यासाठी बनावट चाव्यांचा संच असल्याचे दिसून आले आहे. या चाव्यांच्या मदतीने तो कोणतीही अडथळा न येता घरात प्रवेश करत होता. पोलिस तपासात असेही समोर आले की, त्या रात्री आरोपीने सुमारे 1 लाख रुपये चोरी केली होती.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर अंबोली पोलिसांनी त्याला औपचारिकरीत्या अटक केली आहे. सध्या पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आरोपीविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.