महापौर कोणाचा, सस्पेन्स वाढला! फडणवीस दावोसला गेले… मुंबईत पडद्यामागे हालचालींना वेग

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नसून, याबाबत सस्पेन्स वाढत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस दौऱयावर गेले आहेत. त्याचवेळी मुंबईत हालचालींना वेग आला असून पडद्यामागे बरंच काही घडत आहे.

भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत युतीत निवडणुका लढवल्या. त्यात भाजपला 89, तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. 227 संख्याबळ असलेल्या मुंबई पालिकेत 114 हा बहुमताचा मॅजिक फिगर असून महायुतीकडे 118 इतकं काठावरचं बहुमत आहे. दुसरीकडे शिवसेना-65, मनसे – 6, राष्ट्रवादी – 1, काँग्रेस – 24, अजित पवार गट – 3, एमआयएम- 8, समाजवादी पक्ष – 2 असे एकूण 109 नगरसेवक हा मोठा आकडा समोरच्या बाकांवर आहे. हे आकडे पाहता महापालिकेत कोणत्याही क्षणी बाजी पलटू शकते, असे चित्र आहे. त्यामुळेच नवा महापौर बसण्याआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत.

शिंदे गटाला फुटीची भीती वाटत आहे. त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. यातले बरेच नगरसेवक प्रथमच निवडून आलेत. प्रस्ताव कसे तयार करायचे वगैरे गोष्टी त्यांना माहीत नाहीत. त्यामुळे त्यांचे शिबीर घ्यायचे म्हणून त्यांना येथे ठेवल्याचा दावा आज शिंदे यांनी केला. उद्या गट स्थापन करणार, असे ते म्हणाले.

  • महापौर भाजपचा होणार का, महापौरपदावर तुमचा गट दावा सांगणार का, असे माध्यमांनी विचारले असता, महापौर महायुतीचा होणार, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याबाबत अन्य प्रश्नांवर त्यांनी उत्तर टाळले.

भाजपचा महापौर नको!

मुंबईत भाजपचा महापौर नको, असा सूर निकालानंतर पाहायला मिळत आहे. तमाम मुंबईकरांची ही भावना समाजमाध्यमांतही व्यक्त होतेय. त्यामुळे शिंदे गटातून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चलबिचल असल्याचे कळते. या नगरसेवकांना ताज लँड्स एंडमध्ये काsंडून ठेवलेले आहे. या नगरसेवकांची भूमिका पुढे नेमकी काय राहणार आहे यावर बरीच गणितं ठरणार आहेत.

शिंदेंचा प्रस्ताव नाही

अडीच वर्षे महापौरपद मिळावे अशी मागणी एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्या संसदीय मंडळाकडे आलेली नाही, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. संसदीय मंडळात शिंदे हेसुद्धा आहेत. त्यांची मागणी आल्यास समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार व शिंदे चर्चेने निर्णय घेतील, असे ते म्हणाले.