
मुंबईतील मराठीबहुल मतदारसंघांवरील पकड यंदाच्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेने कायम ठेवली. मुंबईतील बहुतांश पारंपरिक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, 2017 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांनी जास्त मताधिक्य घेतले. त्या तुलनेत मराठी मतदारांनी शिंदे गट व भाजपकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 48 प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही भाजप किंवा शिंदे गटाचे त्यातील बहुतांश प्रभागांमध्ये काहीच चालले नाही. उलट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चोरणाऱ्या शिंदे गटाला मराठी मतदारांनी नाकारल्याचेच आकडेवारी सांगते. या 84 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये शिंदे गटाचा विजय झाला. कमालीचा जोर लावूनही भाजप फक्त 9 प्रभाग जिंपू शकला आणि उर्वरित प्रभागांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य पक्षांचे उमेदवार निवडून आले.
शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या शिवडी, वरळी, माहीम, भायखळा, धारावी आणि वांद्रे पूर्वमधील बहुतांश प्रभाग आपल्याकडे कायम राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. 2017 मध्ये या भागांमध्ये शिवसेनेने 23 प्रभाग जिंकले होते. यावेळी 21 प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तर उर्वरित दोनपैकी एका प्रभागात मनसे व दुसऱया प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे मताधिक्यात वाढ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये मताधिक्क्यात वाढ झाली. त्यात वरळी, माहीम, वांद्रे पूर्व येथील प्रभागांचा समावेश आहे. धारावीतील चारपैकी तीन प्रभागांमध्ये शिवसेना उमेदवार निवडून आले. जोगेश्वरी पूर्व येथील 2017 मध्ये जिंकलेले चारही प्रभाग शिवसेनेने राखले. दिंडोशीतील दोन प्रभागात शिवसेना, तर एका प्रभागात मनसेचा झेंडा फडकला. भांडुप पश्चिम येथील चारपैकी तीन प्रभागांमध्ये शिवशक्तीचे उमेदवार जिंकून आले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 54 लाख 64 हजार 412 इतके मतदान झाले. विजयी झालेल्या उमेदवारांना त्यातील 26 लाख 7 हजार 612 मते मिळाली. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी एकूण मतदानाच्या 13.13 टक्के मते मिळवली. सर्व विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपैकी 27.52 टक्के म्हणजेच 7 लाख 17 हजार 736 मते शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली.


























































