
जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली आहे. त्यात 8 जवान जखमी झाले असून त्यापैकी तिघांना एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी दोनपेक्षा जास्त पाकिस्तानी दहशतवादी लपल्याचा दाट संशय सुरक्षा दलांना आहे. ही चकमक रात्री उशिरापर्यंत होती.
लष्कराच्या जम्मू येथील व्हाईट नाईट कॉर्प्सने या मोहिमेला ऑपरेशन त्राशी-1 असे नाव दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंद्राल-सिंघूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम सुरू केली. लष्कर, पोलीस आणि इतर दलांनी या भागाला वेढा घातला. दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना एका दिशेने गोळीबार सुरू झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या भागात लपलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे असण्याची शक्यता आहे. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

























































