नंदुरबारमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी एकनाथ शिंदे गटाचे नंदुरबार-अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक केली. अटकेनंतर चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले आणि तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात मुंबईला हलवण्यात आले.
शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांचा नंदुरबारमध्ये 10 जानेवारी रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय झाला. त्या मिरवणुकीदरम्यान शहरातील जळका बाजार परिसरात हाणामारी आणि दगडफेक झाली होती. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन त्याच रात्री चौधरी यांच्या घरावर एका गटाने धारदार शस्त्रे आणि पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. चौधरी यांनी या हल्ल्यामागे एक बडा राजकीय नेता असल्याचा आरोप केला होता.

























































