घाटकोपर पूर्वेकडील पटेल चौकाजवळील रस्त्याची दुरवस्था, तातडीने दुरुस्तीची रहिवाशांची मागणी

घाटकोपर पूर्वेकडील पटेल चौकाजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. आर. बी. मेहता मार्गावरील धनजी देवशी शाळा परिसरातील या रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत पडलेले आहे.

घाटकोपर पूर्वेकडील धनजी देवशी शाळेत मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुलांची ये-जा सुरू असते. शाळेजवळील रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे चांगल्या रस्त्याअभावी हाल होत आहेत. हलिमा सुमार कोडाल चेंबर येथे रक्त तपासणीची प्रयोगशाळा आहे. तेथे अनेक ज्येष्ठ नागरिक येतात. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे रक्त तपासणीच्या प्रयोगशाळेपर्यंत पोहोचताना ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होत आहे. ही सर्व परिस्थिती गांभीर्याने विचारात घेऊन पालिका प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतर्फे प्रकाश वाणी यांनी केली आहे.