
दारूगोळा निर्मितीत आत्मनिर्भर झाल्याने हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य वाढले असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. नागपूर येथील सोलर डिफेन्स अॅण्ड एरोस्पेस लिमिटेडमध्ये मध्यम कॅलिबर दारूगोळा प्रकल्पाचे उद्घाटन संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
नागपूरमधील या दारूगोळा प्रकल्पामध्ये 30 मि.मी. दारूगोळा स्वयंचलित पद्धतीने उत्पादित केला जातो. लष्कर आणि नौदलाद्वारे मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. संरक्षणमंत्र्यांनी पिनाका रॉकेट उत्पादन प्रकल्पालाही भेट दिली आणि पिनाका रॉकेटच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सुरक्षा सचिव राजेशकुमार सिंग, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोलर डिफेन्स अॅण्ड एरोस्पेस लिमिटेडचे प्रमुख सत्यनारायण नुवाल उपस्थित होते.

























































