माथेरानमध्ये वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर सुरा ठेवून दहा लाखांचे दागिने लुटले; हात-पाय बांधून सशस्त्र दरोडा

सिगारेट मागण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर चाकू ठेवून सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना माथेरानच्या वन ट्री हिल पॉईंट परिसरात घडली आहे. दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याचे हात-पाय बांधले. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

वन ट्री हिल पॉईंट परिसरात नारायण कदम पत्नीसह राहतात. घरामध्येच दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चारजण आले. त्यांनी दुकानाचे शटर ठोकून सिगारेट मागितली. सिगारेट देण्यासाठी नारायण यांनी शटर उघडताच चार दरोडेखोर आत शिरले. दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर चाकू ठेवून आणि हात-पाय बांधून आठ तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच घरातील दीड लाखाची रोकड चोरून घराला बाहेरून कडी लावून दरोडेखोरांनी पळ काढला.