सामना अग्रलेख – मणिकर्णिका घाटावर बुलडोझर, हिंदुत्व गंगेस मिळाले

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काशीत मणिकर्णिका घाटासह पाच घाट निर्माण केले. त्यावर हजारो रुपये खर्च केले. या सगळ्यावर आता बुलडोझर फिरला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप सरकारच्याच कारवाईने हिंदुत्व गंगेस मिळाले! अहिल्यादेवी होळकरांचे इंदूरस्थित वंशज यशवंतराव होळकरांनी या विध्वंसावर फक्त दुःख चिंता व्यक्त केली. होळकरांना पुजणारे राजकीय भक्त महाराष्ट्रात पुरेपूर आहेत. अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा जखमी स्थितीत घाटावर पडल्याचे भान या लोकांना आहे काय?

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे राजकीय स्वार्थासाठी रचलेले ढोंग आहे हे पदोपदी सिद्ध होत आहे. महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 18 व्या शतकात काशीत मणिकर्णिका घाटाचे निर्माण केले. त्यावर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली बुलडोझर चालवले आहेत. त्याच वेळी प्रयागराज येथे मौनी अमावस्येची पर्वणी साधत त्रिवेणी संगमावर स्नानासाठी निघालेले शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांना ‘योगी’ सरकारने स्नान करण्यापासून रोखले व त्यांच्या भक्तांवर निर्घृण लाठीमार केला. शंकराचार्य स्नान न करताच परत फिरले. हिंदू संस्कृतीला व धर्माला डाग लावणारे काम योगी सरकारने केले. या दोन्ही घटना उत्तर प्रदेशात घडल्या. भगवे वस्त्रधारी योगी महाराज तेथे मुख्यमंत्री आहेत. काशीत हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या ज्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर फिरवले, तेथे पंतप्रधान मोदी हे खासदार आहेत. अर्थात मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त केल्याची चिंता कुणाला वाटली नाही. आठेक दिवसांपूर्वी मोदी यांनी सोमनाथ मंदिरात पूजाअर्चा केली. त्यांनी हिंदुत्वावर राजकीय प्रवचन झोडले. मंदिराबाहेर उघड्या जीपमध्ये उभे राहून दोन्ही हातात ‘डमरू’ फिरवत कपाळी भस्म वगैरे लावून आपले पंतप्रधान राजकीय हिंदुत्वाचे प्रदर्शन करीत होते, पण काशीत मणिकर्णिका घाटावर सरकारी हल्ला झाल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले नाही. मणिकर्णिका घाट पाडला तो विकास सौंदर्यीकरणाच्या नावाखाली, पण जे चित्र समोर आले त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती ढिगाऱ्याखाली जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. उत्तरेत शिंदे, होळकरांनी मराठी शौर्याचा इतिहास निर्माण केला. त्या मराठा

इतिहासाच्या खुणा नष्ट

करण्याचे काम सरकारने केले. भाजपने त्यांच्या कारकीर्दीत हजारो मंदिरांचा विध्वंस केला. मंदिरांचा इतका विध्वंस बाबर, औरंगजेब, चंगेज खान वगैरे आक्रमकांनीही केला नसेल. मंदिरे तोडणे हा भाजपला लागलेला छंद आहे. आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा असलेल्या असंख्य मंदिरांचा विध्वंस मोदी सरकारच्याच काळात झाला. काशीत विकासाच्या, पर्यटनवाढीच्या नावाखाली मोदी काळात शेकडो पुरातन मंदिरांवर निर्दयपणे हातोडे व बुलडोझर चालवले. अनेक प्राचीन मूर्ती त्यात नष्ट झाल्या. अयोध्या मंदिर निर्माणाच्या वेळीही असंख्य मंदिरे, मठ तोडण्यात आले. मध्य प्रदेशातदेखील मंदिरे तोडण्यात आली. स्वतःस हिंदू राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात घाऊक पद्धतीने मंदिरे तोडली जात आहेत. व्यापारीकरण, व्यावसायिकीकरण, सौंदर्यीकरण अशा नावाखाली हिंदूंची मंदिरे खतऱ्यात आणली गेली. मणिकर्णिका घाटावर विध्वंस घडवून पुण्यश्लोक अहिल्यादेवींची मूर्ती पायदळी आणणे हा बोगस हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांचा उन्माद आहे. हिंदुत्वाचा विकास या नावाखाली सांस्कृतिक सत्यानाश चालला आहे. मणिकर्णिका घाटास हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. या घाटावर अंत्यसंस्काराची व्यवस्था आहे. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना थेट मोक्षप्राप्ती होते. मोदी सरकारने त्यांच्या कारभाराने हिंदूंचा कत्तलखाना तर सुरू केलाच आहे, पण त्याच वेळी मेलेल्यांना मोक्षप्राप्ती नाकारणारा बुलडोझरदेखील मणिकर्णिका घाटावर चालवला जात आहे. विकासाला, पुनर्विकासाला विरोध असण्याचे कारण नाही, पण प्राचीन वास्तुरचना अशा बेदरकार पद्धतीने उद्ध्वस्त होऊ नयेत. मणिकर्णिका घाटाच्या

कायाकल्पाचे काम

सुरू आहे. घाटाचा प्लॅटफॉर्म अधिक मोठा बनवण्याची योजना आहे. ज्यामुळे अंतिम संस्कारासाठी म्हणे अधिक सोयीसुविधा मिळतील. मणिकर्णिका घाटावर पोहोचण्यासाठी चिंचोळ्या गल्ल्यांतून जाताना दमछाक होते. अत्यंत जर्जर अवस्था व घाणीच्या साम्राज्यातून तिथपर्यंत पोहोचावे लागते. काशी कॉरिडॉर आणि मणिकर्णिका घाटाच्या नवनिर्माणाची योजना बनवली तेव्हा जुना पुरातन ढाचा व इतिहास कायम ठेवून कायाकल्प करण्याची मागणी झाली. मणिकर्णिका घाटाच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 35 कोटींचा निधी मंजूर केला. हा 35 कोटींचा आकडा डोळे विस्फारणारा आहे. 35 कोटींसाठी हिंदुत्वाचा आणि इतिहासाचा सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त करणे लोकांना मान्य नाही. काशीत मणिकर्णिका घाटासह अनेक विकासकामे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 18 व्या शतकात पार पाडली. अहिल्यादेवींनी 28 वर्षे शासन केले. या काळात त्यांनी 65 मंदिरे, धर्मशाळा, रस्ते, तलाव, नद्यांवर भव्य घाट उभारले. धर्म आणि लोककल्याणाचा संकल्प घेऊन त्यांनी राज्य व्यवस्था राबवली. 1771 ते 1785 च्या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काशीत मणिकर्णिका घाटासह पाच घाट निर्माण केले. त्यावर हजारो रुपये खर्च केले. या सगळ्यावर आता बुलडोझर फिरला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप सरकारच्याच कारवाईने हिंदुत्व गंगेस मिळाले! अहिल्यादेवी होळकरांचे इंदूरस्थित वंशज यशवंतराव होळकरांनी या विध्वंसावर फक्त दुःख व चिंता व्यक्त केली. होळकरांना पुजणारे राजकीय भक्त महाराष्ट्रात पुरेपूर आहेत. अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा जखमी स्थितीत घाटावर पडल्याचे भान या लोकांना आहे काय?