
>>दयानंद पाटील
बोर्डी हे महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्थानक आहे. बोर्डी स्टेशनच्या 20 ते 25 किलोमीटर परिघात फळबागायत व पर्यटन विकास मोठय़ा प्रमाणात होत आहे. या सगळ्या स्तरांतील प्रवासी वर्गाला रेल्वे हे अतिशय उपयुक्त दळणवळणाचे माध्यम होऊ शकते, परंतु सध्या बोर्डी स्थानकात फक्त दोन अप व दोन डाऊन गाडय़ा थांबतात. त्यामुळे येथे येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन तसेच नोकरदार, शेतकरी तसेच मच्छीमार वर्गाला खूप अडचणीही होत आहेत. शटल, पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा दिल्यास या भागातील हजारो आदिवासी, विद्यार्थी व नोकरदार लोकांना त्याचा फायदा होईल.
चर्चगेट ते डहाणू हे उपनगरीय क्षेत्र म्हणून कार्यान्वित आहे. त्यादृष्टीने विरारनंतर डहाणूपर्यंत लोकलच्या दिवसभरात किती फेऱ्या होणे अपेक्षित आहेत याचा विचार गांभीर्याने करायला हवा. विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत किमान दिवसभरात अप-डाऊन अशा 50 फेऱ्या तरी होणे आवश्यक आहेत.
मुंबईपासून अगदी शेजारी म्हणजे विरारनंतर डहाणूपर्यंत उपनगरीय क्षेत्र म्हणून 1995 ला घोषित झाले. मात्र प्रत्यक्षात विरारनंतर डहाणू लोकल 2013 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला डहाणू लोकलच्या दिवसभरात 10 अप तसेच 10 डाऊन अशा फेऱ्या झाल्या आणि कालांतराने या फेऱ्या वाढत जाऊन आजच्या घडीला 21 अप तसेच 21 डाऊन अशा फेऱ्या होत आहेत. अर्थात मागील 10 वर्षांत डहाणू विभागात नागरीकरण खूप वाढले आहे. तसेच औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने ठाणे, भिवंडी,पनवेल ते थेट घोलवडपर्यंत प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डहाणू विभागात लोकल, मेमू आणि शटल गाडय़ांच्या फेऱ्या वाढणे आवश्यक आहे.
डहाणू लोकलच्या किमान पाच फेऱ्या खालील वेळेत अपेक्षित आहेत.
मुंबईकडे जाण्यासाठी डहाणूहून (अप)
1) पहाटे 3ः50, 2) सकाळी – 7ः40, 3) संध्याकाळी- 4ः45, 4) संध्याकाळी- 6ः15, 5) रात्री – 11ः30.
डहाणूकडे जाण्यासाठी विरारहून (डाऊन)
1) सकाळी- 7ः30, 2) दुपारी – 2ः30, 3) संध्याकाळी- 5ः30, 4) रात्री- 8ः00, 5) रात्री- 10ः15.
डहाणू लोकल 15 डब्यांच्या करणेसुद्धा अपरिहार्य आहे.
दुसरा एक गहन प्रश्न म्हणजे वैतरणा स्थानकात- मुंबई-नंदुरबार पॅसेंजरला थांबा मिळणार आहे. वैतरणा रेल्वे स्थानक हे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात असून विरारपासून अवघ्या 7 किमी अंतरावर आहे. या स्थानकातून रोज 18 ते 20 गावांतील नागरिक प्रवास करत असतात. या स्थानकात रात्री दुसऱ्या पाळीतून घरी येणाऱ्या नोकरदार प्रवाशांना रात्री विरार येथून 10ः50 ला सुटणारी 09083 विरार-डहाणू मेमू गेल्यानतंर मुंबई-नंदुरबार पॅसेजर ही गाडी आहे, परंतु ही गाडी वैतरणा स्थानकात थांबत नाही. तरी या गाडीला अप-डाऊन दोन्ही दिशेने थांबा देण्यात यावा.
शिवाय खालीलप्रमाणे दोन गाडय़ांचा विस्तार आवश्यक आहे.
1) वलसाड-उमरगाव मेमू (69154) डहाणू स्थानकापर्यंत विस्तारित करावी.
2) वडोदरा-डहाणू एक्स्प्रेस (22930 ) ही गाडी डहाणू येथे सकाळी 11ः10 येऊन परतीसाठी डहाणू येथून दुपारी 15ः45 ला सुटते. जवळपास ही गाडी डहाणू येथे साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ यार्डमध्ये थाबून असते. या गाडीला विरारपर्यंत विस्तारित केल्यास मुंबई येथील प्रवाशांना वडोदरा स्थानकापर्यंत थेट गाडी उपलब्ध होईल. सदर गाडीस सफाळे, पालघर, बोईसर या रेल्वे स्थानकांत थांबा देण्यात यावा, जेणेकरून विरार-डहाणू दरम्यानच्या अनेक प्रवाशांना फायद्याचे ठरेल.
n ट्रेन क्रमांक 09056 उधना-वांद्रे सुपरफास्ट ट्रेन गुरुवार आणि शुक्रवारी (कामाच्या दिवशी) धावत नाही, ज्यामुळे कामगार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि स्थलांतरितांना (केळवे रोड, वाणगाव, डहाणू, बोर्डी रोड, घोलवड येथून वापी, भिलाड आणि उमरगावला जाणारे स्थलांतरित) प्रचंड त्रास होत आहे. म्हणून याआधी नियमित सुरू असलेली ट्रेन क्रमांक 59046 बाबत काही तोडगा निघेपर्यंत ट्रेन क्रमांक 09055/09056 या गाडय़ा दररोजची सेवा म्हणून सुरू करण्यात याव्यात.
n नवी मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल. (या भागात नवी मुंबईला जाण्यासाठी आणि जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही.)
n उमरोली स्थानकात शटल, पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा मिळावा.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू उपनगरीय रेल्वे स्थानका दरम्यान असलेले उमरोली हे एक SG- 3 ग्रेड रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 9-10 कोटी असे आहे. सदर स्थानक पालघर आणि बोईसर स्थानकांदरम्यान येते. सदर उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या दृष्टीने या स्थानकावर सर्व शटल, मेमू थांबणे आवश्यक आहे, परंतु खाली दर्शविलेल्या गाडय़ा उमरोली स्थानकात थांबत नाहीत. तरी या सर्व गाडय़ांना उमरोली स्थानकात थांबा देण्यात यावा अशी विनंती आहे.
n पालघर-ठाणे जिल्हा रेल्वेने जोडावा.
पालघर आणि ठाणे पूर्वी एकत्रित जिल्हा होता तेव्हासुद्धा जिह्यात रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती. अपेक्षा आहे पालघर जिल्हा ठाणे जिह्याला जोडण्यासाठी आणि भिवंडी औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या-येणाऱ्या कामगार वर्गासाठी आणि सामान्य नागरिक प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू ते ठाणे, भिवंडी अशा मेमू सेवा सुरू करण्यात याव्यात, ज्या वसई, भिवंडीमार्गे धावू शकतील.
n बोर्डी स्थानकात शटल, पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा मिळावा.
1994 साली पश्चिम रेल्वेवर बोर्डी स्थानकाची स्थापना झाली. बोर्डी हे महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्थानक आहे. झाई हे मच्छीमारीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे तसेच बोर्डी स्टेशनच्या 20 ते 25 किलोमीटर परिघात फळबागायत व पर्यटन विकास मोठय़ा प्रमाणात होत आहे. झाई व बोरीगाव येथे बऱ्याचशा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, इंजिनीअरिंग महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी वर्ग गेली कित्येक वर्षे लांबून प्रवास करीत आहे. या सगळ्या स्तरांतील प्रवासी वर्गाला रेल्वे हे अतिशय उपयुक्त दळणवळणाचे माध्यम होऊ शकते, परंतु सध्या बोर्डी स्थानकात फक्त दोन अप व दोन डाऊन गाडय़ा थांबतात. त्यामुळे येथे येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन तसेच नोकरदार, शेतकरी तसेच मच्छीमार वर्गाला खूप अडचणीही होत आहेत. शटल, पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा दिल्यास या भागातील हजारो आदिवासी, विद्यार्थी व नोकरदार लोकांना त्याचा फायदा होईल.































































