
तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलीस आणि पुरवठा विभागाला यश आले आहे. 30 हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त केला असून एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवरील कारवाईमुळे ऑईल माफियांचे धाबे दणाणले आहेत.
भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर इ-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे यांच्या पथकाने कंपनीच्या आवारात धडक देत टँकरच्या कॉकमधून द्रव पदार्थ काढून पाहणी केली असता त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले. टँकरमधील पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल, याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठवले आहेत.


























































