Bajaj Pune Grand Tour 2026 – मलेशियाच्या तेरेंगानूचा फर्ग्युस ब्राउनिंग सुसाट

हिंदुस्थानची पहिली कॉन्टिनेंटल बहुस्तरीय सायकल शर्यत ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर 2026’ सोमवारी दुपारी डेक्कन जिमखानाजवळील गुडलक चौक येथून उत्साहात सुरू झाली. या पाच दिवसीय स्पर्धेत मलेशियाच्या ‘तेरेंगानू सायकलिंग टीम’च्या फर्ग्युस ब्राउनिंगने पहिला दिवस गाजवला.

या स्पर्धेत आशिया खंडातील 78, युरोपमधील 69, तर ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभागी झाले आहेत. हिंदुस्थानचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून, देशांतर्गत सायकलिंगसाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे. पहिल्या दिवशी मलेशियाच्या ‘तेरेंगानू सायकलिंग टीम’च्या फर्ग्युस ब्राउनिंगने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने अवघ्या 8 मिनिटे 05.89 सेकंदांत 7.5 किलोमीटर अंतर कापून अव्वल स्थान पटकावले. ताशी 50 किलोमीटरपेक्षा जास्त सरासरी वेगाने सायकल चालवत ब्राउनिंगने सर्वात वेगवान वेळ नोंदवली आणि मानाची ‘यलो जर्सी’ पटकावली.