जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा आणखी एक नवा मित्र, ओबीसी बहुजन आघाडीला सोबत घेणार

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणखी एका मित्राला सोबत घेणार आहे. ओबीसी बहुजन आघाडीसोबत आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

काँग्रेसने महापालिका निवडणुका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढल्या होता. या काँग्रेस आणि वंचित आघाडीला राज्यामध्ये विविध महापालिकांत चांगल्या प्रकारे यश मिळाले. लातूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येण्यास वंचितची मोठी मदत झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसी बहुजन आघाडीला सोबत घेण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे. डी. तांडेल यांच्या उपस्थितीत आज केली.

भाजपकडून धनगर, ओबीसींची फसवणूक – हर्षवर्धन सपकाळ

भाजपची सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन, असे आश्वासन फडणवीस यांनी 2014 साली दिले होते, पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे या समाजाचा भाजप व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत – प्रकाश शेंडगे

राज्यातील महायुती सरकारकडून ओबीसींची फसवणूक सुरू आहे. ओबीसींच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 27 टक्के आरक्षण ओबीसींना मिळाले, मात्र त्यावर घाला घालण्याचे काम केले जात आहे. कुणबी दाखले देण्याचे काम केले जात आहे. आरक्षणाचा मुद्दा असेल, आमचे प्रश्न असतील, यावर आवाज उठवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.