Ratnagiri Nagar Parishad – भाजपला दूर ठेवत महत्वाच्या समित्या शिंदे गटाने बळकावल्या

रत्नागिरी नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीत शिंदे गटाने सर्व विषय समित्या बळकावत भाजपला दूर लोटले आहे. भाजपला एकाही विषय समितीचे सभापतीपद मिळाले नाही.

रत्नागिरी नगरपरिषदेत ३२ पैकी शिंदे गट आणि भाजप महायुतीचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शिंदेगटाचे २३ आणि भाजपचे ६ नगरसेवक आहेत. भाजपला उपनगराध्यक्ष पद देण्यात आले आहे. आज विषय समित्यांची निवडणूक झाली. या निवडीत पाचही महत्त्वाच्या समित्या शिंदे गटाने ताब्यात घेतल्या. उपनगराध्यक्ष पदाच्या वाट्याला येणारी शिक्षण व क्रीडा समिती भाजपच्या वाट्याला आली आहे. उर्वरित बांधकाम समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती, महिला आणि बालकल्याण समिती, नियोजन समिती शिंदे गटाने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत जागावाटपातही शिंदे गटाने ३२ पैकी २६ जागा आपल्याकडे ठेवत भाजपला फक्त सहा जागा दिल्या होत्या. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीपदापासून भाजपच्या नगरसेवकांना वंचित रहावे लागले आहे.