
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडून आलेले तीन नगरसेवक हे विरोधी बाकावर बसून निर्भीडपणे जनतेची आणि शिवसेनेची बाजू मांडतील असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. विनायक राऊत यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित तीन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हे तिन्ही नगरसेवक सत्तेचा भाग नसून रत्नागिरी नगरपरिषदेत विरोधी बाकावर बसून शिवसेनेची ठाम, निर्भीड व जनहिताची भूमिका मांडणार आहेत. सत्तेसमोर झुकणारे नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे, अन्यायाविरोधात लढणारे आणि रत्नागिरीकरांच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष करणारे निर्भीड शिवसैनिक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्ता, पद आणि सोयीपेक्षा सत्य, संघर्ष आणि स्वाभिमानाला प्राधान्य देणे हीच खरी जनहितवादी भूमिका असून, रत्नागिरी नगरपरिषदेत हा विरोधी आवाज अधिक बुलंद राहील, असेही राऊत म्हणाले. यावेळी नगरसेवक केतन शेट्ये, फौजिया मुंज आणि अमित विलणकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


























































