
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविरोधात (ईव्हीएम) देशभरात प्रचंड संताप आहे. ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ईव्हीएम हटवून जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी आज मुंबईत उग्र आंदोलन झाले. आंदोलकांनी थेट मंत्रालयासमोरील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरच धडक दिली. या वेळी आंदोलकांनी आयोगाच्या सचिवांवर बांगड्या फेकून निषेध नोंदवला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच झालेल्या या आंदोलनाने एकच खळबळ उडाली आहे.
मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे. ते सतत गजबजलेले असते. महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी करत आहे. त्यामुळे कार्यालयात आज वर्दळ होती. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानकपणे काही आंदोलक आयोगाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी ईव्हीएमविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचीही तारांबळ उडाली. आंदोलकांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर ते छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले. त्यात प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे-पाटील यांचाही समावेश होता. सत्ताधारी पक्ष ईव्हीएमचा गैरवापर करून निवडणूक जिंकत असल्याचा आरोप करत उंबरे-पाटील यांनी ईव्हीएमवर बंदी घाला, अशी मागणी केली. या वेळी पोलिसांनी उंबरे-पाटील यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेले प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव, पुष्पक देशमुख आणि हिमानी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ईव्हीएमबंदीबाबत निरुत्तर असलेल्या आयोगाला आज जाब विचारण्यासाठी आम्ही आयोगाच्या कार्यालयात गेलो असता दोन तास ताटकळत ठेवले गेले, अशी माहिती प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी दिली. आवारे-पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएमवर बंदी न घातल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.
ईव्हीएमवर बंदीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे-पाटील 16 जानेवारीपासून धाराशीवच्या कळंब तांदुळवाडी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाबाबत त्यांनी आयोगालाही पूर्वकल्पना देत ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाकडून काहीच उत्तर आले नाही. आयोगाच्या सचिवांना विचारणा केली असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.
गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी देशात लोकशाही ठेवली नाही
लोकशाही वाचवण्यासाठी मी उपोषणाला बसलोय. मी कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी देशात लोकशाही ठेवली नाही. न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावर दबाव आणू नका, असे मी त्या दोन व्यापाऱ्यांना सांगतो. एक मराठी माणूस नडला तर काय होते हे त्यांना 48 तासांत दिसेल, असा इशारा बाळराजे आवारे-पाटील यांनी दिला.































































