
‘शिवसेना’ नावाचा चार अक्षरी मंत्र देऊन कोटय़वधी मनात मराठी अस्मितेचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष या 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुखांचे हे जन्मशताब्दी वर्ष तमाम मराठीजनांसाठी ‘उत्सवी वर्ष’ ठरणार असून याची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळय़ाने होणार आहे. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी खास आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. षण्मुखानंदमधील सोहळय़ाला उद्धव ठाकरे व राज ठाकरे संबोधित करणार असून पालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवतीर्थावर निष्ठेचा सागर
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी शिवतीर्थावर निष्ठेची वारी पाहायला मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतीर्थावर येतात. यंदाचे वर्ष शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचे असल्याने मोठी गर्दी उसळणार आहे. ते पाहता महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. स्मृतिस्थळी चाफ्यासह विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.






























































