
बांधकाम चालू असलेल्या एका रस्त्यावरील खड्ड्यात पडलेली नोएडातील इंजिनीअरची ग्रँड विटारा ही कार तब्बल तीन दिवसांनंतर बाहेर काढण्यात आली.
16 जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला होता. त्यात 27 वर्षीय इंजिनीअर युवराज मेहता याचा जागीच मृत्यू झाला. कार सापडल्यामुळे या घटनेच्या चौकशीला वेग आला आहे.
दाट धुके, अंधार रिफ्लेक्टर, सूचना फलक आणि संरक्षक भिंतीच्या अभावामुळे युवराजची कार सुमारे 50 फूट खोल नाल्यात पडल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार युवराज सुमारे अर्धा तास त्याच्या मोबाईल फोनचा टॉर्च फ्लॅशलाईट लावून मदतीसाठी हाक मारत राहिला, परंतु त्याला वेळेवर मदत मिळू शकली नाही. कारमध्ये डॅशकॅम बसवण्यात आला होता. त्यांच्या फुटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.
ही पहिलीच घटना नाही!
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ‘‘ही पहिलीच घटना नाही. अवघ्या एका आठवड्यापूर्वी त्याच ठिकाणी एक ट्रक नाल्यात पडला होता. त्यानंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला गेला नाही आणि सुरक्षिततेचे कोणतेही उपाय केले गेले नाहीत,’’ असे स्थानिकांचे म्हणणे आहे.




























































