अमेरिकेत 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या

अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचे वादळ आले. या वादळामुळे रस्ते अपघात झाले. अमेरिकेतील एका आंतरराज्यीय महामार्गावर 100 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. तसेच अनेक गाड्या रस्त्यावरून घसरल्या. यामध्ये अनेक जखमी झाले असून नेमका आकडा समोर आला नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महामार्गावर बर्फात अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य जोरात सुरू आहे. कमी दृश्यमानतेमुळे अनेक ट्रक आणि गाड्या एकमेकांवर आदळल्या. शेकडो वाहने अनेक तास वादळात अडकून पडली होती. या काळात अनेक गाड्या पूर्णपणे बर्फात रुतून बसल्या. बर्फाळ वाऱयामुळे पुढे चालणाऱया गाड्याही क्वचितच दिसत होत्या.