विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून, हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील पहिला-टी ट्वेंटी सामना नागपुरात

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप अवघ्या दोन आठवडय़ांवर येऊन ठेपला असताना हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका म्हणजे दोन्ही संघांसाठी अंतिम रंगीत तालीमच ठरतेय. जसं परीक्षेआधी सराव परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेतला जातो, तसंच या मालिकेतून विश्वचषकातील आव्हानांची चाचपणी केली जाणार आहे.

बुधवारी व्हीसीए स्टेडियमवर मालिकेचा पडदा उघडतोय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान आणि मिचेल सँटनरच्या कर्णधारपदाखालील न्यूझीलंड हे दोन्ही संघ जवळपास पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. कारण हा केवळ द्विपक्षीय सामना नाही, तर विश्वचषकाच्या रणधुमाळीआधीचा सराव, प्रयोग आणि आत्मपरीक्षणाचा मंच आहे. फलंदाजीतील संतुलन, गोलंदाजीतील पर्याय, क्षेत्ररक्षणातील चपळता आणि दडपणाखाली निर्णयक्षमता, हे सगळंच या मालिकेत तपासलं जाणार आहे.

विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून, हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील पहिला-टी ट्वेंटी सामना नागपुरातनिकाल नाही, तयारी महत्त्वाची न्यूझीलंडचा टी-20 कर्णधार मिचेल सँटनरनेही याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. एकदिवसीय मालिकेतील यशाच्या पार्श्वभूमीवरही तो निकालांपेक्षा तयारीवरच अधिक भर देणार आहे. ‘आम्हाला इथे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये काही यश मिळालं आहे. पण या टी-ट्वेंटी मालिकेकडे आम्ही विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणूनच पाहतोय. विश्वचषकात ज्या परिस्थिती असतील, त्याचसारख्या परिस्थितीत एका दर्जेदार संघाविरुद्ध खेळण्याची ही उत्तम संधी आहे,’ असे सँटनरने स्पष्ट केले.

टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानचा चेहरामोहरा वेगळाच असतो, याची जाणीव न्यूझीलंड कर्णधाराला आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील निकाल मनावर न घेता, पुढील मोठय़ा लढतीसाठी योग्य सूर सापडतो का, यावरच लक्ष असल्याचं त्याने सांगितलं. एकूणच, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या महासंग्रामाआधी ही मालिका म्हणजे दोन्ही संघांसाठी रणनीती आखण्याची प्रयोगशाळा, संयोजन ठरवण्याची कसोटी आणि आत्मविश्वास कमावण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. निकाल महत्त्वाचा असला, तरी नजरा खऱया अर्थाने विश्वचषकावरच खिळलेल्या आहेत.