
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निकडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी ‘मला आता उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या,’ अशी मिश्किल टिप्पणी जलमंदिर येथे भेटीवेळी केली.
चिखली (ता. कराड) येथील कुलदीप क्षीरसागर हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत. ते विधानसभेसाठीही इच्छुक होते. मात्र, त्यावेळी त्यांना थांबवण्यात आले होते. कुलदीप क्षीरसागर व परिसरातील नागरिकांनी मसूर गटातून क्षीरसागर यांना उमेदवारी द्यावी म्हणून खासदार उदयनराजे यांची जलमंदिर येथे भेट घेतली. यावेळी कुलदीप क्षीरसागर यांनी आता मोठय़ा गावांचा प्रश्न संपला आहे. आता मला उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी अजब मागणी केली. त्यावर खासदार उदयनराजे यांनी हसत त्यांना मिठीत घेतले. यावेळी एकच हशा पिकला. यावेळी सुनील काटकर, काका धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




























































