Photo – शक्तिप्रदर्शनातून युद्धसज्जतेचे दर्शन; टँक, हेलिकॉप्टर, सुखोई अन् ड्रोन

अहिल्यानगरजवळ मंगळवारी भारतीय सेनेच्या ताकदीचा आणि आधुनिक युद्धसज्जतेचा प्रभावी प्रत्यय नागरिकांना आला. आर्मर्ड कोरच्या नेतृत्वाखाली येथील के. के. (खर्जुना खरे) रेंजवर भव्य एकात्मिक गोळीबार प्रदर्शन व संचालन सराव यशस्वीरीत्या पार पडला. या सरावात जमिनीवरील, हवेतून होणाऱ्या आणि तंत्रज्ञानाधारित युद्धक्षमतांचा समन्वय सजीव स्वरूपात सादर करण्यात आला.

या सरावात टँक, पायदळ, हवाई दल आणि अत्याधुनिक नेटवर्क-केंद्रित युद्धप्रणाली यांचा अचूक समन्वय कसा साधला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मानव आणि यंत्र यांची संयुक्त क्षमता, वेगवान निर्णयप्रक्रिया, अचूक लक्ष्यभेदन आणि समन्वित कारवाई यावर भर देण्यात आला. आधुनिक रणभूमीवर बदलणाऱ्या युद्धतंत्रांना सामोरे जाण्यास भारतीय सेना सज्ज असल्याचे या सरावातून स्पष्ट झाले.

या एकात्मिक सरावात आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल तसेच मेकनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल या भारतीय सेनेच्या प्रमुख प्रशिक्षण संस्थांचा सहभाग होता.

प्रत्यक्ष युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून नव्या रणनितींचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनव युद्धाभ्यास सादर करण्यात आला.

या शक्तिप्रदर्शनात टी-90 भीष्म, टी-72 अजेय आणि अर्जुन मुख्य युद्धक टँक, बीएमपी-2 लढाऊ वाहने, मोर्टार वाहक ट्रक, हलकी व मध्यम श्रेणीची हेलिकॉप्टर्स, भारतीय वायुसेनेचे सुखोई-30 लढाऊ विमान, स्वार्म ड्रोन तसेच गुप्तचर, देखरेख आणि टोही प्रणालींचा समावेश होता.

जमिनीवरील टँकांची गडगडाटी हालचाल, आकाशात घोंघावणारी लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या अचूक हालचालींनी संपूर्ण रणांगण थरारक बनले.