भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि MIM वाजंत्री म्हणून हजर, अंबादास दानवे यांचा टोला

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीत भाजपच्या उमेदवार अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशित अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविकेचे नाव असून त्याला एमआयएमच्या नगरसेवकाने अनुमोदन दिले आहे. या प्रकाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

”आश्चर्यच! हिवरखेडमध्ये ‘महायुती’ की ‘महाखिचडी’? भाजप उमेदवार: अनिता वाकोडे, सूचक: काँग्रेस (रुबिजा सलमान), अनुमोदक: एमआयएम (आजम खान). हिवरखेड नगरपरिषदेत दुर्मिळ योग जुळून आलाय. भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत. ऑल द बेस्ट!”, अशी पोस्ट शेअर केली आहे.

हिवरखेड नगरपालिकेत भाजप नेत्या अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव आहे. तर यात अनुमोदक म्हणून MIM चे आजम खान यांचे नाव आहे. त्यावरून सध्या भाजपवर जोरदार टीका देखील होत आहे.