
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मिंधे गटाला बहुसंख्य जागा मिळाल्या तरी मिंधे गटाला मराठी जनतेने नाकारले आहे. मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मिंध गटाचे मताधिक्क्य घटले आहे.
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. मतदान टक्का म्हणजेच पक्षाला मिळालेल्या एकूण मतांचे प्रमाण पाहता, भाजप आणि मिंधे गटाचा टक्का मागील निवडणुकांच्या तुलनेत घसरलेला दिसतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा मतदान टक्का 29.34 टक्के होता, तो महापालिका निवडणुकीत घटून 28.03 टक्क्यांवर आला. तर मिंधे गटाला मोठा फटका बसला असून त्यांचा मतदान टक्का विधानसभा निवडणुकांतील 18.36 टक्क्यांवरून थेट 12.79 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईत 56.74 लाख मतदारांनी मतदान केले होते. मात्र 15 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत ही संख्या घटून 54.76 लाखांवर आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मतदान टक्का मात्र दोन्ही निवडणुकांत जवळपास समान राहिला. महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मतदान टक्का 22.94 टक्के इतका होता, तर विधानसभा निवडणुकांत तो 22.63 टक्के होता. मात्र प्रत्यक्ष मतांची संख्या थोडी घटली असून महापालिका निवडणुकीत 12.56 लाख मते मिळाली, जी विधानसभा निवडणुकांतील 12.84 लाख मतांपेक्षा कमी आहेत.






























































