
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेच्या मग्रुरीला जोरदार चपराक देणारी ठरली. सरकारी यंत्रणा, गुंडगिरी आणि पैसा ओतूनही भाजप आणि शिंदे गटाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. याउलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिलेदारांनी जोरदार झुंज देत ११ जागा जिंकल्या, तर जवळपास १० जागावर ३०० ते १५०० मतांनी निसटता पराभव झाला. प्रभाग चारमध्ये तर रूपा शेट्टी यांचा अवघ्या आठ मतांनी पराभव झाला. हा पराभव शिवसैनिकांसह मोहनेकरांना चुटपूट लावणारा ठरला.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या १२२ पैकी २० जागा बिनविरोध झाल्या होत्या. भाजप आणि शिंदे गटाने दबावतंत्र वापरून २० जागा बिनविरोध केल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे होत होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उर्वरित १०२ जागा नेटाने लढवल्या. टिटवाळा, आंबिवली, मोहने, बल्याणी परिसरातील प्रभागांमध्ये शिवसैनिकांनी जोरदार झुंज दिली. मात्र रूपा दया शेट्टी यांचा अवघ्या आठ मतांनी विजय हुकला. शेट्टी यांना १० हजार ५६० मते मिळाली. शिवसेनेच्या निष्ठावंत रणरागिणीचा पराभव मोहनेकरांच्या जिव्हारी लागला.
सत्ताधाऱ्यांच्या गलिच्छ राजकारणाला न जुमानता प्रत्येक मतदारांपर्यंत शिवसेनेचे मशाल चिन्ह पोहोचवण्यात आले. प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या तेजश्री गायकवाड, राहुल कोट यांनी प्रस्थापितांच्या बुरुजाला हादरा देत विजय मिळवला.


























































