
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय, औद्योगिक व प्रशासकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. गट म्हणून नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी दावोस दौरे, महापौर निवडणूक, गुंतवणूक दावे, पालघरचा प्रश्न, शिंदे गट, भाजप नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयावरही गंभीर आरोप केले.
संजय राऊत म्हणाले की, सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील मुख्यमंत्री दावोसला ‘पिकनिक’साठी गेले आहेत. स्वित्झर्लंडच्या बर्फात मुख्यमंत्र्यांची पिकनिक सुरू असून ती संपल्यानंतर हेच मुख्यमंत्री महापौर निवडणुकांमध्ये लक्ष घालतील, असा टोला त्यांनी लगावला. दावोसमधील औद्योगिक परिषद अत्यंत हास्यास्पद ठरत असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, देशात एकमेकांना न भेटणारे मुख्यमंत्री दावोसला जाऊन भेटतात आणि भारतातीलच कंपन्यांशी करार करतात. जनतेच्या कराच्या पैशातून हे दौरे केले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
‘‘खरंच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश किंवा इतर राज्यांत गुंतवणूक येते आहे का, हे स्पष्ट व्हायला हवे. वर्षानुवर्षे दावोसला जाऊन महाराष्ट्रासाठी 14 लाख कोटींचे करार आणि 14 लाख रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जाते. मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार असल्याचे आकडे दिले जातात. पण हे आकडे सुखावणारे असले तरी वास्तव कुठे आहे?’’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस असोत किंवा इतर कुणी, प्रत्येक वेळी दावोस दौऱ्यानंतर 14-15 लाख रोजगार आणि 15-16 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे दावे केले जातात. मात्र हे करार नेमके कुणाबरोबर झाले, हे कधीच स्पष्ट होत नाही. जीएसडब्ल्यू, लोढा, पंचशील यांसारख्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईतच आहेत. संगमनेर येथील एका कंपनीचा करारसुद्धा दावोसला झाल्याचे वाचल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मग महाराष्ट्रातच करार का करत नाही? भारतातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय?’’ असा सवाल त्यांनी केला.
आकडे फुगवून सांगण्याऐवजी प्रत्यक्षात 1 हजार कोटींची गुंतवणूक आली असेल तर तेवढेच सांगा, असे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वर्षी दावोस दौरे झाले असून एकूण आकडे जवळपास 75 लाख कोटींच्या आसपास जातात. मात्र प्रत्यक्ष गुंतवणूक कुठे आहे आणि या दौऱ्यांवर किती खर्च झाला, हे देशाला आणि राज्याला दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत 9 लाख रोजगार कुठल्या माध्यमातून निर्माण होणार, कोणते उद्योग आणि कोणत्या जागांवर येणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही राऊत म्हणाले. धारावी आणि मुंबईतील भूखंड ताब्यात घेणारा अदानी उद्योगसमूह 5 हजार रोजगारही देऊ शकत नसताना 9 लाख रोजगाराचा आकडा कुठून आला? जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका.
महापौर निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आतली माहिती अशी आहे की शिंदे गटाला महापौर पदासाठी कोणीही गांभीर्याने विचारात घेत नाही. मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीला जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावे लागत आहे, याहून अपमानास्पद गोष्ट दुसरी नाही, अशी टीका त्यांनी केली.
गट नोंदणीच्या प्रक्रियेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, जे सदस्य गट निर्मितीसाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेची कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ती यशस्वी होईल. मशाल चिन्हावर निवडून आलेले सर्व लोक आता पक्षाचेच आहेत. पक्षाची आचारसंहिता किंवा निवडणूक आयोगाचे नियम न पाळल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपमध्ये अर्धे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून गेलेले आहेत. मात्र ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत बोलावणार नाहीत. काही गोष्टी नैतिकता, नीतिमत्ता आणि कायद्याच्या चौकटीतच कराव्या लागतात आणि नियम न पाळणाऱ्यांना अपात्र ठरवले जाईल, असे ते म्हणाले.
शिंदे गटावर टीका करताना त्यांनी हा गट अमित शहांचा पक्ष असल्याचा आरोप केला. अमित शहांकडे मागणी केली की ती लगेच पूर्ण होते का, हे पाहावे लागेल, असे सांगत त्यांनी या गटाला सतत झोळी पसरावी लागते, असे म्हटले. ‘‘बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नका. त्यांच्या शताब्दीशी तुमचा काहीही संबंध नाही,’’ अशी टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. राज ठाकरे यांची प्रकृती सध्या सुधारत असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





























































