सामान्य नागरिकांचे आयुष्य असह्य, दिल्लीत रहिवाशांच्या घरी गटाराचे पाणी; राहुल गांधी यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमांवरील निवेदनातून सत्ताधारी व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सामान्य नागरिकांचे आयुष्य असह्य झाले असून संपूर्ण व्यवस्था सत्तेच्या अधीन गेल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी यंत्रणा परस्परांची पाठ थोपटत एकत्र येऊन जनतेचे हक्क पायदळी तुडवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतल्या एका निवासी भागात घराघरांत गटाराचे पाणी शिरले आहे. त्यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानमध्ये लोभाची साथ पसरली असून शहरांमध्ये वाढत चाललेली नैतिक अधोगती तिचे भीषण रूप असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. ही अधोगती स्वीकारली गेल्यामुळे समाज हळूहळू नष्ट होत असल्याची गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. ही अवस्था ‘न्यु नॉर्मल’ म्हणून मान्य केल्याने नागरिक सुन्न, निःशब्द आणि उदासीन झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. वेळीच उत्तरदायित्वाची ठाम मागणी केली नाही, तर ही नैतिक कुज प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.