आभाळमाया – ग्रहांची ‘वाकुडी’ चाल?

>> वैश्विक

आमच्या खगोल कार्यक्रमांमध्ये कधीकधी गंमतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. एका अशाच चर्चासत्रात कोणीतरी प्रश्न केला की, ग्रह वक्री होतात म्हणजे काय? योग्य उत्तर दिले जात असतानाच एकाने म्हटले की, ‘आम्ही तर समजत होतो की ग्रह वक्री झाला म्हणजे तो उलट दिशेने चालू लागला आणि आकाशात दिसतंही तसंच, नाहीतर आधी सिंह राशीत असणारा ग्रह एकदम कर्क राशीत कसा दिसायला लागेल?’ अनेकांना त्यांचा मुद्दा अगदी बिनतोड वाटला.

विज्ञानाच्या आधारे सोप्या गोष्टीसुद्धा समजावताना नाकी नऊ येतात. कारण पारंपरिक समजुती चटकन बदलायला मनं तयार नसतात. धूमकेतूंचे ‘वाईट’ परिणाम किंवा ग्रहणांचे शुभाशुभ वगैरेंवर आजही चर्चा होतच असते. अमावास्या शब्दात वाईट काहीच नसतं. ‘अमा’ म्हणजे एकत्र आणि ‘वसती’ म्हणजे राहाणे म्हणजे अमावास्या. मग या दिवशी कोण एकत्र असतं, तर सूर्य आणि चंद्र! ते एकाच वेळी उगवतात आणि एकाच वेळी मावळतात. साहजिकच अमावास्येच्या रात्रीच्या आकाशात चंद्र दिसत नाही. खरं तर खगोल अभ्यासकांसाठी अशी निरभ्र रात्र म्हणजे ‘पर्वणी’च. मात्र असा समजुतीचा घोटाळा सौम्यपणे, आलेखनाच्या (ग्राफिकच्या) माध्यमातून समजावून घ्यावा लागतो. म्हणून तर 1995 तसंच 99 आणि 2009 तसेच 2010 च्या सूर्यग्रहण दर्शनासाठी आमच्या हिंदुस्थानातल्या विविध अभ्यास सहलींसाठी शेकडो लोक आले.

आपल्याला वैश्विक सत्य जाणून घ्यायचं असेल तर काही रूढ समजुती सुधारल्या पाहिजेत, हे महाराष्ट्रातलेच बाराव्या शतकातले खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनीही सांगितलं होतं. पण लक्षात कोण घेतो! अर्थात असा समज असणाऱयांना, जाणकारांनीच समजून घेऊन नीट स्पष्टीकरण द्यायला हवं हीच खरी ‘शिकवणी.’ त्यामुळे ग्रहांच्या ‘वक्र’ पिंवा ‘वाकुडय़ा’ चालीविषयी आमच्या कार्यक्रमात साधार माहिती दिली जाते.

वास्तविक ग्रह वक्री होण्याचं गणित फारसं कठीण नाहीच. साध्या -सोप्या उदाहरणांमधूनही ते स्पष्ट करता येतं. मात्र त्यासाठी सहनशीलता (पेशन्स) हवा. आता या वर्षीचं म्हणजे 2026 चं उदाहरण घेऊ या. कशी असेल ग्रहांची वक्री स्थिती? तर, बुध ग्रह 5 जानेवारी ते 25 जानेवारी आणि 10 मे ते 31मे तसेच 14 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळात वक्री असेल. शुक्र ग्रह 7 मार्च ते 19 एप्रिल या काळात वक्री होईल. मंगळ 8 जानेवारीलाच मार्गी झाला. तो या वर्षी ‘वक्री’ होणार नाही. गुरू 23 जुलै ते 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री दिसेल. शनि 11 जून ते 24 ऑक्टोबरपर्यंत वक्री असेल. युरेनस 27 जाने. 26 ते 12 जाने. 2027 पर्यंत वक्री स्थितीत दिसणार आहे आणि शेवटचा नेपच्युन 30 जून ते 5 डिसें. 26 या काळात वक्री दिसणार आहे. यातलं ग्रह वक्री ‘असणार’ आहे यापेक्षा तो तसा ‘दिसणार’ आहे हेच खरं. हा आपण पृथ्वीनिवासी असण्याचा परिणाम आहे. हे असं ग्रहांचं ‘राशी बदलणं’ का दिसतं ते जाणून घेण्याआधी त्यांची प्रत्येकाची सूर्याभोवती फिरण्याची गती लक्षात घेऊया.

बुध ग्रह त्याच्या कक्षेत म्हणजे सूर्यापासून 5 कोटी 91 लाख 6 हजार किलोमीटर अंतरावरून तर शुक्र-10 कोटी (1 लाख 99 हजार 995 किलोमीटर, पृथ्वी-14 कोटी 95 लाख 99 हजार 951 किलोमीटर, मंगळ 22 कोटी 9 लाख 39 हजार 920 किलोमीटर, गुरू 77 कोटी 83 लाख 33 हजार 257 किलोमीटर, शनी-1 अब्ज 42 कोटी 94 लाख 28 किलोमीटर, युरेनस 2 अब्ज 87 कोटी 98 लाख 9 हजार 228 किलोमीटर आणि नेपच्यून – 4 अब्ज 50 कोटी 42 लाख 99 हजार 579 किलोमीटर एवढय़ा अंतरावरून सूर्याभोवती फिरतो.

आता या सर्व ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची प्रत्येक सेकंदाची गती लक्षात घ्या. बुध सूर्याभोवती 88 दिवसांत प्रतिसेकंद 47.7 किलोमीटर, शुक्र. 225 दिवसात प्रतिसेकंद 35 किलोमीटर पृथ्वी 365 दिवसांत प्रतिसेकंद 29.8 किलोमीटर, मंगळ 685 दिवसांत प्रतिसेकंद 24 किलोमीटर, गुरू 11.86 वर्षात, प्रतिसेकंद 13 किलोमीटर, शनी 29.46 वर्षात प्रतिसेकंद 9.7 किलोमीटर, युरेनस 84 वर्षात प्रतिसेकंद 6.8 किलोमीटर आणि नेपच्युन 165 वर्षात प्रतिसेकंद 5.4 किलोमीटर वेगाने (सूर्याभोवती) फिरतो.

या ग्रहगतींसाठी एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपण आपल्या कारने एका मार्गिकेतून 60 किलोमीटर वेगाने जात असताना शेजारच्या मार्गिकेतील कार 50 किलोमीटर वेगाने आपल्यापुढे असेल तर ती आपल्याला पलीकडच्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर दिसेल. मात्र आपला वेग जास्त असल्याने आपण पुढे जाऊन ‘मागे’ पडलेल्या कारकडे पाहिलं तर ती कदाचित आपण पूर्वीच ओलांडलेल्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर दिसेल. मग तरी कार ‘उलट’ गतीने जात असेल का? तर नाही. आपल्या गतीसापेक्ष ती मागे पडली तरी तिच्या गतीने पुढेच जात असेल. पण आपल्यासाठी मात्र ती ‘वक्री’ होईल.

इतका साधा सोपा हा वक्री-मार्गीचा हिशेब आहे. त्यात ग्रहांच्या गतीशिवाय अन्य काही नाही. असे सर्वच ग्रह त्यांच्या त्यांच्या गतीनुसार परस्परांसाठी कधीतरी वक्री ठरतातच. आपली पृथ्वीही काही ग्रहांवरून ‘वक्री’ दिसू शकेल. सूर्यमाला आणि निसर्गाच्या नियमांनी चालणारे ग्रह निर्हेतुक, आपल्याच गतीने मार्गक्रमण करीत असतात. पण त्यांना हेतू चिकटवले तरी त्यांच्या चालीत ‘वेडावाकुडा’ (वक्री) बदल होत नसतो. त्यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणात अचानक ‘बदल’ झाला तर ती मोठी आपत्तीच ठरेल. तो खरंच झाला तर आपली अवघी ग्रहमाला डळमळेल! तसे होणे नाही हे आपल्याला आश्वस्त करणारं आहे!