शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर, कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी

शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पेडणेकर यांनी कोकण भवन येथे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांकडे अधिकृत शिवसेना पक्षाच्या गटाची नोंदणी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत निवडून आलेल्या प्रत्येक पक्षाला आपल्या गटाची अधिकृत नोंदणी कोकण भवन विभागीय आयुक्तांकडे करणे अनिवार्य असते. यामुळे नोंदणी झालेल्या नगरसेवकांचा गट संबंधित पक्षाचा अधिकृत गट समजला जातो. पालिकेत कोणत्याही प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मतदान घ्यावे लागल्यास या गटाने घेतलेली भूमिका संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते, तर गटनेता आपला पक्ष आणि गटाच्या वतीने पक्षाची भूमिका सभागृह आणि समित्यांमध्ये मांडत असतो. त्यामुळे पालिकेतील गटनेता पद महत्त्वाचे मानले जाते. यानुसार आज शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर गटनेत्या म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर नवी मुंबई येथील कोकण भवनमध्ये विभागीय आयुक्तांकडे शिवसेना गटाची नोंदणी करण्यात आली.

शिवसेनेने माझ्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी सांभाळताना ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेनेच्या सर्वच नेत्यांचे मला मार्गदर्शन लाभेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन! – किशोरी पेडणेकर, गटनेत्या, शिवसेना

शिवसेनेकडून चार वेळा नगरसेविका

शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या सलग चौथ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या वरळीतील प्रभाग क्र. 199 मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करून निवडून आल्या आहेत.

गटनेता निवडीनंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक बसमधून बेलापूरमधील कोकण भवन येथे पोहचले. कोकण विभागीय आयुक्तांकडे किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेच्या गटाची नोंदणी केली. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब उपस्थित होते.