
इंधन वाहून नेणाऱया टँकर्सचे वाढते अपघात व गॅसगळतीच्या घटनांमुळे चेंबूरमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील बहुतेक अपघातांना बी. डी. पाटील मार्गालगत रेल्वेच्या जागेत होणारी अवजड वाहनांची पार्किंग कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे ही पार्किंग त्वरित येथून हटवण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
बुधवारी एका एलपीजी टँकरला झालेल्या अपघातामुळे व गॅस गळतीच्या घटनेमुळे बी. डी. पाटील मार्गावरील असुरक्षित पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गालगत शंकर देऊळ ते गव्हाण गावदरम्यान रेल्वेने रुळालगतची जागा पार्किंगसाठी दिली आहे. मात्र पार्किंगसाठी योग्य सुविधा निर्माण केलेली नाही. तिथे रस्त्याला लागूनच अवजड वाहने पार्क केली जातात. सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नाही. येथे कुठलीही सुरक्षा भिंत नाही. या रस्त्यावर विजेचे दिवे नाहीत. गाडय़ा लावताना व काढताना संपूर्ण रस्ता जाम होतो. कंत्राटदारांकडून मनमानी केली जाते. 100 गाडय़ांची परवानगी असेल तर 1000 गाडय़ा लावल्या जातात. या सगळय़ाचा रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. दिवसाला या ठिकाणी सुमारे दोन हजार गाडय़ा जात-येत असल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही पार्किंग रद्द करून अन्यत्र हलवा, अशी मागणी होत आहे.
शिवसेनेचा पाठपुरावा
बी. डी. पाटील मार्गालगतच्या धोकादायक पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेकडून गेल्या सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. माजी नगरसेविका निधी शिंदे यांनी रेल्वे, वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडे पत्रव्यवहार केला. पार्किंग येथेच ठेवायची असेल तर ती नियमानुसार करा, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करा अशी मागणी त्यांनी केली होती. ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागेवर पार्किंग तळ हलवा, अशी सूचनाही शिंदे यांनी केली होती, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी माहिती शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.

























































