
चितळसर मानपाडा येथे म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली काढलेल्या सोडतीमधील 156 विजेत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या विजेत्यांकडून म्हाडा घरासाठी 52 लाखांऐवजी केवळ 36 लाख 51 हजार रुपये आकारणार आहे. त्यामुळे 25 वर्षांनंतर या विजेत्यांना न्याय मिळणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली काढलेल्या लॉटरीत ठाण्यातील चितळसर येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील 200 घरांचा समावेश होता. त्यानुसार अर्ज केलेल्या 156 जणांना या योजनेत घरे लागली. परंतु या भूखंडावर आरक्षण असल्याचे कारण पुढे करत ठाणे महापालिकेने येथील घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. प्रकल्प रखडल्यानंतरही विजेत्यांनी म्हाडाकडून अनामत रक्कम परत घेतली नव्हती. हे विजेते घराच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यानच्या काळात म्हाडाने तांत्रिक अडथळा दूर करून येथे घरे उभारली. गेल्या वर्षी काढलेल्या लॉटरीत म्हाडाने चितळसर येथील 869 घरांचा समावेश केला होता. याशिवाय 156 विजेत्यांसाठी घरे राखीव ठेवली होती. लॉटरीत घरांच्या किमती 52 लाख रुपये ठेवल्याने या घरांच्या किमती कमी करण्यासाठी या विजेत्यांनी म्हाडाकडे मागणी केली होती. अखेर या 156 विजेत्यांच्या मागणीला यश आले असून म्हाडाने केवळ 36 लाख 51 हजार रुपयांत त्यांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढच्या आठवड्यात ओसी मिळणार?
चितळसर येथील या इमारतींना पुढच्या आठवड्यात ओसी मिळण्याची शक्यता आहे. ओसी मिळताच म्हाडाकडून विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विजेत्यांना दिलासा मिळाला आहे.





























































