
स्वतःच्याच कर्मचाऱ्याच्या रेल्वे अपघाताची नुकसानभरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला दिले.
या कर्मचाऱ्याचा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाला होता. या कर्मचाऱ्याकडे एक्स्प्रेस प्रवासाचे वैध तिकीट नव्हते, असा निष्कर्ष काढत रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने कुटुंबीयांना नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात कुटुंबीयांनी अपील दाखल केले. न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. न्या. जैन यांनी न्यायाधिकरणाचा निकाल रद्द करत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.
पासवर मोहोरची गरज नाही
रेल्वे कर्मचाऱ्याला मोफत लोकल प्रवासासाठी पास मिळतो. कर्मचाऱ्याला जर एक्स्प्रेसने प्रवास करायचा असल्यास मोफत पासवर तशी मोहोर करून घ्यावी लागते. तशी मोहोर अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पासवर नव्हती. त्यामुळे या कर्मचाऱ्याला भरपाई मिळणार नाही, असे न्यायाधिकरणाचे म्हणणे होते. न्यायाधिकरणाचे हे म्हणणे न्यायालयाने खोडून काढले. एक्स्प्रेस प्रवासासाठी अशा प्रकारची मोहोर पासवर असणे आवश्यक नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
गैरवापर केलेला नाही
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मोफत पासचा गैरवापर झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याने मोफत पासचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नाही, असेही न्या. जैन यांनी नमूद केले.






























































