
मुंबईच्या गर्दीत भरकटलेल्या व भीक मागून खाणाऱ्या वृद्धेला तिच्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे काम जे.जे. मार्ग पोलिसांनी केले आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर तिघा मुलांना व त्यांच्या 65 वर्षांच्या आईला फार मोठा दिलासा मिळाला. पोलिसांना जे.जे. जंक्शनच्या इथे एक वृद्ध भीक मागताना मिळून आली. पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या वृद्धेला चेंबूर येथील निवारागृहात ठेवले. तिथे त्या भिक्षेकरी महिलेला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांची गेल्या 12 वर्षांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाली असून मुंबईत मिळेल तिथे राहते व भीक मागून खाते असे समोर आले. तसेच परभणी येथील एका गावाचे नाव सांगत तेथे माझे कुटुंबीय असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्याआधारे वरिष्ठ निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परभणी पोलिसांनी संपर्क साधून त्या महिलेचे कुटुंबीय शोधून काढले.





























































