
काशिमीरा येथील बसस्टॉपवर बेस्ट बसमध्ये चढत असताना चालकाने घाईने दरवाजा बंद केल्यामुळे प्रवासी पडून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजेश चौहान असे त्याचे नाव असून पायावरून बसचे चाक गेल्याने त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. काशिमीरा पोलिसांनी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजेश चौहान (३०) हा तरुण सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या कामावर जाण्यासाठी दहिसर सर्व्हिस रोडवरील काशिमीरा बसस्टॉप येथे उभा होता. दहिसर केतकीपाडा येथे जाण्यासाठी तो बेस्टच्या एसी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने प्रवासी तक्रारदार दरवाजाच्या आत शिरता असतानाच चालकाने प्रवाशाची पर्वा न करता बसचा दरवाजा बंद केला. प्रवासी बाहेरच्या बाजूला रस्त्यावर कोसळले. बसचे पाठीमागील चाक राजेश याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.




























































