घाणेकर नाट्यगृहाची तिसरी घंटा तीन महिने बंद, डागडुजीसाठी काम सुरू करणार

गडकरी रंगायतनपाठोपाठ पोखरण रोड येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहाची तिसरी घंटा तब्बल तीन महिने बंद राहणार आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम करताना कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. यासाठी नाट्य कलावंतांशी चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश करावा, तसेच प्रेक्षकांच्या सोयीसुविधांचाही विचार करून कार्यवाही करावी असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून या निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. काशिनाथ घाणेकर नाटधगृर

या कामांचा समावेश

नाट्यगृहाच्या मुख्य प्रेक्षागृहातील तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. वॉटरप्रूफिंग, प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल कामे, प्रेक्षागृहातील लाईट फिटिंग, साऊंड सिस्टीम, एअर कर्टन, वातानुकूलन व्यवस्था, स्टेज दुरुस्ती, रूफ गार्डन, व्हीआयपी कक्षातील पडदे बदलणे तसेच स्वच्छतागृहांच्या सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्राप्त झालेला निधी नाट्यगृहाच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठीच वापरण्यात यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.