पक्षाच्या आदेशामुळेच मी फोन बंद ठेवलेला – सरिता म्हस्के

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरिता म्हस्के यांनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सरिता म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात गेलो नसल्याचे सांगितले. तसेच पक्षाकडूनच त्यांना मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

”गेली नऊ वर्ष मी या निवडणूकीसाठी मेहनत घेत होते. दहा दिवसांपूर्वीच माझे तिकीट कापले गेले होते. त्यामुळे मी देवाला साकडे घातले होते की माझ्या वाटेतील सर्व अडचणी दूर होऊन जाऊ दे. मी पाच दिवसाच्या आत तुझ्या दर्शनाला येईन. त्यानुसार निकालानंतर लगेचच मी देवदर्शनाला गेले होते. तिथून मला यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे मी नॉट रिचेबल होते. माझ्या सेफ्टीसाठीच पक्षाने मला फोन बंद ठेवायला सांगितलेले पण तरिही मी मिलिंद नार्वेकर यांच्या मी संपर्कात होते”, असे सरिता म्हस्के यांनी स्पष्ट केले.