
मुंबईच्या कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान VCCCI अॅन्युअल विंटेज कार फिएस्टाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रोल-रॉयस फँटम या जागतिक दर्जाच्या कारचे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे. या प्रदर्शनातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांच्या मालकीची 1928 रोल-रॉयस फँटम-1 (17EX). ही गाडी तब्बल 95 वर्षांनंतर हिंदुस्थानात परतली असून, मुंबईकरांना ती जवळून पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. या गाडीने पेबल बीच आणि विला डी’एस्टे सारख्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित प्रदर्शनांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे.

प्रदर्शनातील इतर महत्त्वाची आकर्षणे –
प्रसिद्ध उद्योजक योहन पूनावाला यांच्या संग्रहातील सात ऐतिहासिक रोल-रॉयस फँटम मॉडेल्स एकाच छताखाली पाहायला मिळतील. यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वापरलेली 1979 ची फँटम-VI आणि कतारच्या शासकांची 1962 ची फँटम-V यांचा समावेश आहे. प्राणलाल भोगीलाल यांच्या संग्रहातील 1936 रोल-रॉयस P-III, नितीन दोसा यांची जगातील एकमेव शिल्लक असलेली 1933 ची हडसन आणि गौतम सिंघानिया यांच्या संग्रहातील 1927 रोल-रॉयस अशा अनेक विंटेज गाड्या या प्रदर्शनाची शोभा वाढवणार आहेत.
विंटेज गाड्यांसोबतच फेरारी ४५८ एपेर्टा, फेरारी पिस्ता आणि पोर्टोफिनो यांसारख्या आधुनिक वेगाच्या बादशाह गाड्यांचेही दर्शन घडणार आहे. गेल्यावर्षी इथे 1 लाख 18 हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली होती.
वेळापत्रक आणि प्रवेश –
हे प्रदर्शन 25 जानेवारी रोजी सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. (15 वर्षांखालील मुलांसाठी ओळखपत्र दाखवल्यास विनामूल्य प्रवेश).तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘रोड सेफ्टी ड्राईव्ह’ – वर्ल्ड ट्रेड सेंटर ते वरळी आणि पुन्हा चर्चगेट असा गाड्यांचा ताफा मार्गक्रमण करेल.






























































